‘३ इडियट्स’ नाकारल्याबद्दल काजोल म्हणते – “पश्चात्ताप नाही, कारण जे आपलं आहे ते आपल्यालाच मिळतं”

बातमी शेअर करा

३ इडियट्स’ नाकारल्याबद्दल काजोल म्हणते – “पश्चात्ताप नाही, कारण जे आपलं आहे ते आपल्यालाच मिळतं”

मुंबई (प्रतिनिधी) – २००९ मध्ये प्रदर्शित झालेला आणि आजही तितकाच लोकप्रिय असलेला ‘३ इडियट्स’ हा चित्रपट बॉलिवूडमधील एक माईलस्टोन मानला जातो. आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर आणि बोमन इराणी यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांनी सजलेला हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला होता. केवळ ५५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल ४०० कोटींहून अधिक कमाई केली होती. मात्र तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटातील ‘प्रियाच्या’ भूमिकेसाठी आधी अभिनेत्री काजोलला विचारण्यात आले होते?

अनेक वर्षांनी काजोलने यावर मौन सोडले आहे. सध्या ती आपल्या आगामी ‘माँ’ या भयपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, याच दरम्यान एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, “कोणता सुपरहिट चित्रपट नाकारल्याचा कधी पश्चात्ताप झाला का?” यावर काजोलने थेट ‘३ इडियट्स’चा उल्लेख केला.

“पटकथा भावली नाही, म्हणून नकार दिला”

काजोल म्हणाली, “असं खूप वेळा घडतं. उदाहरणार्थ, ‘३ इडियट्स’ चित्रपट मला ऑफर झाला होता. पण मी तो नाकारला. तरीदेखील मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला वाटतं, जे तुमच्यासाठी असतं, ते तुम्हाला मिळतंच. मी अनेक चांगले प्रोजेक्ट्स केले आहेत आणि या निर्णयावर मी समाधानी आहे.”

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत काजोलने हे मत व्यक्त केलं. हिरानी यांच्या या बहुचर्चित चित्रपटात प्रियाच्या भूमिकेसाठी काजोलला सुरुवातीला विचारणा करण्यात आली होती, पण पटकथेशी फारसं नाते न जुळल्याने तिने तो नाकारला होता. पुढे ही भूमिका करीना कपूर खानच्या वाट्याला आली आणि ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली.

‘माँ’मध्ये काजोल झळकणार शक्तिशाली मातेसारखी

दरम्यान, काजोलचा आगामी ‘माँ’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भयपटाच्या पार्श्वभूमीवर आधारित या सिनेमात काजोल एका आईची भूमिका साकारत असून, जी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसी शक्तींशी सामना करते. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर डोक्यावर घेतला आहे आणि चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा