६० व्या वाढदिवसाला दारूच्या नशेत हरवलेले क्षण : आमिर खानचा थेट खुलासा, म्हणाला – “मला काहीच आठवत नाही!”

बातमी शेअर करा

६० व्या वाढदिवसाला दारूच्या नशेत हरवलेले क्षण : आमिर खानचा थेट खुलासा, म्हणाला – “मला काहीच आठवत नाही!”

मुंबई (प्रतिनिधी) – अभिनेता आमिर खानने नुकतीच वयाची साठी पार केली असून, १४ मार्च रोजी त्याचा ६० वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, हा दिवस त्याच्या आठवणीत कायमचा कोरला गेला असता, ते क्षण दारूच्या नशेत हरवले गेले, अशी कबुली खुद्द मिस्टर परफेक्शनिस्टने दिली आहे. ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या एका स्पष्ट मुलाखतीत आमिरने आपल्या दारूच्या सवयी, त्यातून निर्माण झालेली निराशा आणि त्याने घेतलेला बदलाचा निर्णय उलगडून सांगितला.

“पार्टी मोठी होती, पण मी स्वतःला थांबवू शकलो नाही”

आमिर खान म्हणाला, “६० व्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रमंडळींनी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. मी काही काळ दारू पिणं पूर्णपणे थांबवलं होतं, पण त्या दिवशी सगळ्यांच्या आग्रहाखातर थोडी घेतली. मात्र माझी एक कमजोरी आहे – एकदा सुरुवात केली की थांबवता येत नाही. त्यामुळे रात्री ७ वाजता सुरुवात झालेली पार्टी ९ पर्यंत माझ्या जास्तीच्या नशेमुळे गडबडली.”

“दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला काहीच आठवत नव्हतं”

तो पुढे म्हणतो, “पार्टी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला काहीच आठवत नव्हतं. फक्त मोबाईलमधले फोटो आणि व्हिडीओ पाहून मला समजलं की लोकांनी माझ्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी बोलल्या. पण त्याचा एक क्षणही मला आठवत नव्हता. त्यामुळे माझ्या ६० व्या वाढदिवसाच्या कुठल्याच आठवणी माझ्या मनात राहिलेल्या नाहीत.”

दारूपासून दूर राहण्याचा घेतला निर्णय

या अनुभवांमुळे आमिरने दारूपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचंही तो सांगतो. “दारूमुळे मला निराशा आली होती, आणि माझं आयुष्यही त्यात हरवत होतं. त्यामुळे मी आता पूर्णपणे अल्कोहोलपासून दूर आहे,” असं तो स्पष्टपणे म्हणतो.

‘सितारे जमीन पर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या आमिर खान ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आपल्या भूमिकेला न्याय देताना तो वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांचा वापर कसा करतो, याची झलक या नव्या सिनेमातूनही मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा