जि.प. उच्च प्राथमिक शाळेत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण
धरणगाव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत माजी सैनिक यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी माजी सैनिक राजेश बन्सी बोरसे यांच्या शुभ हस्ते सकाळी ०७:३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. धरणगाव येथील गौतम नगर मधील रहिवासी माजी सैनिक राजेश बन्सी बोरसे यांनी आपल्या कारकिर्दीत ऑपरेशन पवन (श्रीलंका), ऑपरेशन मेघदूत (सियाचीन – ग्लेशियर), ऑपरेशन रक्षक (जम्मू काश्मीर), ऑपरेशन रक्षक (पंजाब), ऑपरेशन रायनो (आसाम), आणि ऑपरेशन विजय (जम्मू काश्मीर) अशा विविध ऑपरेशन मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत देशसेवा केली. श्री. बोरसे नायक पदावर असतांना सेवानिवृत्त होणाऱ्या राजेश बोरसे यांनी १७ वर्ष देशसेवा केली. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक व माजी सैनिक राजेश बोरसे यांचे स्नेही राजेंद्र रुंझु गायकवाड तसेच पदवीधर शिक्षक महेंद्र पाटील सर, रजनीकांत पाटील सर, शाळेतील सर्व महिला शिक्षिका मंगला सोनार, नलिनी बाविस्कर, भारती पाटील इ. सर्व बंधू भगिनी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचलन आर. बी. पाटील सर यांनी केले.