माईंच्या जयंतीनिमित्त जि.प.शाळा नेरी बु.येथे वैचारिक प्रबोधन
महापुरुषांचे खरे चरित्र जाणून घेणे काळाची गरज ;दिलीप खोडपे (माजी जि.प.अध्यक्ष)
महिलांच्या वाळवंटी आयुष्यांचे माईंनी केले नंदनवन ;व्याख्याते लक्ष्मणराव पाटील
जामनेर : तालुक्यातील नेरी बु.येथील जि.प.शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतातून मुख्याध्यापक मनोहर पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश व शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच उपस्थित अतिथी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान जि.प.सदस्य दिलीप खोडपे सर होते तर प्रमुख वक्ते म्हणून धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. दामिनी कुमावत आणि खुशी कोळी या विद्यार्थिनींनी माईंच्या विषयीचे गीत अतिशय सुमधुर आवाजात सादर केलं. गायत्री भावसार या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून माईंच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शाळेच्या माजी विद्यार्थी चेतन निंबाडे व त्यांच्या मित्र परिवाराला वडाचे झाड भेट दिले तसेच नेरी दिगर च्या केंद्रप्रमुख शुभांगीताई पाटील व शिक्षिका भगिनींना सवित्रीमाईंचे पुस्तक भेट स्वरूप दिले. सावित्रीमाई फुले यांचे जीवनकार्य, बालिका दिन, महिला मुक्ती दिन, स्त्री शिक्षण दिन याविषयी सविस्तर माहिती दिली. विविध उदाहरणे तसेच गोष्टींच्या माध्यमातून प्रबोधन करतांना व्याख्याते पाटील यांनी सांगितले की, महिलांच्या वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करण्याचं श्रेय सर्वतोपरी सवित्रीमाईंनाच द्यावे लागेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप खोडपे सरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची स्तुती केली तसेच महापुरुषांचे चरित्र समजून घेणं काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून फॉरेन्सिक युनिट जळगावचे योगेश वराडे, केंद्रप्रमुख शुभांगीताई पाटील, शा.व्य.स.अध्यक्ष रविंद्र भोई, शा.व्य.स.सदस्य पूजा पाटील, ग्रा.पं.सदस्य निशा तायडे, माजी सरपंच तथा ग्रा.पं.सदस्य भगवान इंगळे, ग्रा.पं.सदस्य सावित्राबाई भिल, मुख्याध्यापक मनोहर पाटील यांच्यासह शिवदास माळवे, कैलास गोसावी, श्रीमती देवांगणा काळे, संगीता पवार, स्नेहल कानडे, पुष्पा चौधरी हे शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेचा पालकवर्ग, गावातील महिला व पुरुष वर्ग हजर होते. शाळेच्या २१२ पटसंख्येपैकी ७२ मुले व ९१ मुली असे एकूण १६३ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या अतिशय देखण्या तथा वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी ग्रुप, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षकवर्ग जि.प.शाळा नेरी बु.।। ता. जामनेर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी ग्रुप ने परिश्रम घेतले. वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतः श्रमदान करून माजी विद्यार्थांच्या ग्रुपने वक्त्यांनी दिलेल्या वडाच्या झाडाचा फक्त स्विकार न करता शाळेच्या आवारात ताबडतोब वृक्षारोपण देखील करून घेतले तसेच या आधी वृक्ष लागवड करून संवर्धन केलेल्या वड, कडुनिंब या वृक्षांना देखील भेटी दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर पाटील यांनी केले.