मुंबई चौफेर I 30 डिसेंबर २०२२ I रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’सिनेमा मोठा गाजावाजा करत रिलीज झाला. पण रिलीज होताच या सिनेमानं प्रेक्षकांची निराशा केली. अभिनेता रणवीर सिंगचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सर्कस’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. रिलीजच्या 7 दिवसांनंतरही दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ने अपेक्षेप्रमाणे फारच कमी कमाई केली आहे. दरम्यान, ‘सर्कस’ने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत किती कोटींची कमाई केली हे जाणून घेऊया.
गोलमाल फ्रेंचाइजीपासून सिंघम, सूर्यवंशी सारखे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या रोहित शेट्टीची यावेळी प्रचंड निराशा झाली आहे. महाराष्ट्रात रोहित शेट्टीचे असंख्य चाहते आहेत. पण महाराष्ट्रातच ‘सर्कस’ला प्रेक्षक मिळेनासे झाले आहेत.
ट्रेड अॅनालिस्टच्या मते हा चित्रपट फ्लॉप मानला जात आहे. कारण रिलीजच्या 7 दिवसांत ‘सर्कस’ आपल्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने कोणालाही प्रभावित करू शकला नाही.
सातव्या दिवशी ‘सर्कस’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा विचार करा, सॅकनिल्च्या रिपोर्टनुसार, ‘सर्कस’ने गुरुवारी केवळ 2.10 कोटींची कमाई केली आहे, जी खूपच निराशाजनक आहे.
23 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या ‘सर्कस’कडून चाहत्यांना आणि निर्मात्यांना मोठ्या आशा होत्या. पण हा चित्रपट ना चाहत्यांना आवडला ना निर्मात्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला. ‘सर्कस’च्या बॉक्स ऑफिसवर निराशाजक कामगिरीमुळे निर्मात्यांना नक्कीच धक्का बसला आहे. कारण हा सिनेमा 150 कोटींचा खर्च करुन तयार केला आहे. मात्र रणवीर सिंग स्टारर ‘सर्कस’ नं रिलीजच्या या 7 दिवसांत बॉक्स ऑफिसवर केवळ 30.40 कोटींची कमाई केल्याची माहिती आहे.
चित्रपटाची कथा रॉय आणि जॉय हे दोन भाऊ आणि त्यांचे डुप्लिकेटस यांच्यावर आधारलेली आहे. एक रॉय हा मुंबईतील श्रीमंत तरुण बिंदूवर प्रेम करत असतो. तर दुसरा रॉय हा उटीमध्ये सर्कसमध्ये काम करणारा करंट मॅन असून, मालासोबत त्याचा विवाह झालेला आहे. श्रीमंत रॉय आणि करंट मॅन रॉय यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे. करंट मॅन जेव्हा विजेच्या तारा हातात घेतो तेव्हा श्रीमंत रॉयच्या अंगातही वीज संचारते आणि त्या वीजेचा शॉक त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला बसतो. या दोघांसोबत जॉय नावाचे दोन भाऊही आहेत. चहाची बाग खरेदी करण्यासाठी मुंबईतील रॉय जॉयसोबत उटीला जातो. दोघांची नावं सारखी असल्यामुळे मुंबईतील रॉय उटीला पोहोचल्यावर सर्व त्याला करंट मॅन रॉय समजतात. त्यानंतर जी धमाल उडते ती चित्रपटात आहे.