उमदे प्रकाशनाने दिला आपल्या नावातून आदर्श
संभाजीनगर येथील औरंगपुरा भागात असलेले उमदे प्रकाशन मागील ७० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वाचकांना उमद्या पध्दतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात गरुडझेप घेण्यासाठी धडपडत असलेल्या विद्यार्थांना संतुष्ट करण्यासाठी अविरतपणे कार्य करत आहेत.
समस्त कुणबी पाटील पंच मंडळ धरणगाव यांना समाजाचे संचालक किशोर पाटील या दातृत्ववान व्यक्तींनी ३१,००० रुपये स्पर्धा परीक्षेची पुस्तकं घेण्यासाठी देणगी स्वरूपात दिले होते. त्याच पैशांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ग्रंथसंपदा घेण्याच्या उद्देशाने काल संभाजीनगर येथे जाण्याचा योग जुळून आला. तळमजल्यावर स्थित असलेल्या उमदे प्रकाशनाच्या दिशेने नजर स्थिरावल्यावर प्रथमदर्शनी असं जाणवतं की हे तर छोटंसं दुकान आहे. ज्याप्रमाणे दुरून पाहिल्यावर समुद्राच्या अथांगतेचा अंदाज लावता येत नाही त्याचप्रमाणे वरून पाहिल्यावर या ज्ञानरुपी उमदे सागराचा अंदाज बांधता येत नाही. आतमध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, वैचारिक इ. नानाविध प्रकारची ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. वडिलांनी सुरू केलेल्या या व्यवसायाबद्दल उमदे प्रकाशन चे सर्वेसर्वा संतोष उमदे भरभरून बोलत होते. जितका वेळ तिथे होतो तितका वेळ विद्यार्थ्यांशी बोलतांना संतोष काकांचे उमदं व्यक्तिमत्त्व येणाऱ्या प्रत्येकाचा संतोष करतांना पाहून मनात विचार आला की माणूस साधेपणा टिकवून ठेवल्याने मोठा होतो. बॉलिवूड च्या भाषेत सांगायचं झालं तर ‘असली सुंदरता तो, सादगी में ही होती हैं’। जळगांव जिल्ह्यातील सर्व बुक सेलर्स ला पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या संतोष उमदे यांना त्यांच्या यशाचे गमक विचारले असता त्यांनी दिलेल्या उत्तराने आम्ही भारावून गेलो. संतोष सर म्हणतात की, मी फक्त काउंटर सांभाळतो सर्व व्यवस्थापन संभाळण्याचं कार्य माझे सहकारी सतिष पाखरे, विवेक शिंदे आणि वहाब जमादार ही मंडळी सांभाळतात. आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना लहान न समजता त्यांच्यामुळे आपण आहोत हे सांगणारे संतोष उमदे शिवरायांचे सूत्र जगण्याचा आदर्श देताय असंच जाणवलं. ग्रंथसंपदा घेण्याच्या या अनमोल भेटीप्रसंगी व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, चंद्रमौळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे मोहीत पाटील तसेच संभाजीनगर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विशाल तोमर उपस्थित होते.