पुण्यात २६ लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह दोघांना बेड्या; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

बातमी शेअर करा

पुण्यात २६ लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह दोघांना बेड्या; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

​खराडी बायपास आणि खुळेवाडी परिसरात टाकला छापा; मोटार व अमली पदार्थ जप्त

​पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात अमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत विमानतळ पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून एमडी ड्रग्ज आणि वाहनांसह एकूण २६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​याप्रप्रकरणी प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. वडगाव शेरी) आणि उबेर अन्सार खान (वय २७, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

​अशी झाली कारवाई

​विमानतळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी हरी पुंडे आणि लालू कऱ्हे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, खराडी बायपास परिसरातील फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने सापळा रचून प्रीतम कुलकर्णी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३.५९ ग्रॅम एमडी आणि एक दुचाकी सापडली.

​तपासातून दुसऱ्या आरोपीचा पर्दाफाश

​अटक केलेल्या प्रीतमची सखोल चौकशी केली असता, त्याने या तस्करीमध्ये उबेर खान याचा सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत खुळेवाडी परिसरातून उबेर खानलाही ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये ४ ग्रॅम एमडी आणि एक चारचाकी मोटार जप्त करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.

​​ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आता या दोन्ही आरोपींचे ‘कनेक्शन’ शोधत आहेत.

बातमी शेअर करा