राज्यात उष्णतेचा तडाखा; अकोल्यात पारा ४४ अंशांवर, उष्णतेच्या लाटेचा इशारा

बातमी शेअर करा

राज्यात उष्णतेचा तडाखा; अकोल्यात पारा ४४ अंशांवर, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुणे : राज्यात उन्हाचा तडाखा तीव्र होत असून वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः होरपळत आहेत. विदर्भ व मराठवाड्यात सूर्य आग ओकत असून बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. मंगळवारी अकोला येथे तब्बल ४४ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले.

कोरड्या हवामानामुळे उष्ण वारे वाहत असून, गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. जळगाव (४२.५), सोलापूर (४३.२), अमरावती (४३.८), वर्धा (४३.५) यांसारख्या शहरांमध्येही तापमानाचा पारा चढलेला आहे.

हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला असून, सांगली व सोलापूर जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण पट्ट्यात मात्र उष्ण व दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारपासून काही भागात वातावरण बदलण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा