जैन इरिगेशनमध्ये आयकर जागरूकता उपक्रम; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

बातमी शेअर करा

जळगाव, दि. २५ — भारत सरकारच्या आयकर विभागातर्फे सुरु असलेल्या इन्कम टॅक्स जागरूकता अभियानाचा एक भाग म्हणून जैन इरिगेशन सिस्टम्स लि., प्लास्टिक पार्क येथे आयकर विषयक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जैन इरिगेशनच्या विविध विभागातील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित

सरकार आणि करदाते यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी तसेच Income Tax Return (ITR) Filing प्रक्रियेची सुलभता वाढवण्यासाठी आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी — कृष्णमूर्ती अय्यर, मनीष भगत, दीपक श्रीवास्तव, कुणाल वाघ आणि रविंदर कुमार — यांनी सहकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या मान्यवरांचे स्वागत जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष (कार्मिक) सी. एस. नाईक यांनी केले.

या कार्यक्रमात कंपनीच्या आयकर विभागाचे लक्ष्मीकांत लाहोटी, जितेंद्र कापसे, तसेच एक्साईज अँड कस्टम विभागाचे डी. आय. देसर्डा आणि अनिल मुंगड उपस्थित होते.

ITR भरताना आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेचे स्पष्टीकरण

अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांना खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती दिली:
• ITR कसे भरावे आणि कोणती कागदपत्रे आवश्यक असतात
• कर सवलती (Deductions) कशा मिळवायच्या
• बोगस क्लेम ओळखण्याची पद्धत आणि त्याचे भविष्यातील नुकसान
• आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती कशी तपासावी व अपडेट करावी

या मार्गदर्शनामुळे करदात्यांमध्ये आयकर भरण्याबाबतची जागरूकता आणि विश्वास वाढेल, असे उपस्थितांचे मत होते.

सायबर फसवणुकीपासून सावधान

अधिकाऱ्यांनी अलीकडे वाढत चाललेल्या सायबर क्राईम आणि Income Tax Fraud संदर्भात विशेष चेतावणी दिली. आयकर विभागाच्या नावाने फसवणुकीचे फोन, संदेश किंवा ईमेल आल्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता थेट आयकर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमाला जैन इरिगेशनमधील शंभरहून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
आयकर विभागाने दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होईल, असे सांगत लक्ष्मीकांत लाहोटी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करा