शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंना काँग्रेसचा पाठिंबा – विजय वडेट्टीवार यांची सरकारवर जोरदार टीका

शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंना काँग्रेसचा पाठिंबा – विजय वडेट्टीवार यांची सरकारवर जोरदार टीका
नागपूर (प्रतिनिधी) – राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा पाठिंबा जाहीर केला.
“बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. हीच आमची मागणी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “राज्यात कोट्यवधींचे प्रकल्प मंजूर होतात, मुंबईतील जमीन उद्योजकांना दिली जाते, पण शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र सरकारच्या नजरेआड का राहतात? शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकवा का मारतो? हे समजत नाही.”
राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमण्याचा प्रस्ताव समोर ठेवण्यात येत आहे. मात्र वडेट्टीवार यांनी या भूमिकेवरही टीका केली. “निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी, हमीभाव, बोनस यांची आश्वासने देणारे सरकार आता फक्त समित्या नेमत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना तातडीने मदत देण्याऐवजी समित्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जातो,” असा आरोप त्यांनी केला.
“शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर केवळ चर्चा नको, आता ठोस निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे समिती नेमण्याऐवजी तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी जोरदार मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम