अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत;
अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत; पीएमआरडीएचा विक्रम आशिया-इंडिया बुकमध्ये नोंद
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गृहनिर्माण क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत चिखली येथील सेक्टर-१२ प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली निवासी इमारत उभारण्याचा विक्रम केला आहे. या अभूतपूर्व यशाची दखल घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये या कामगिरीची नोंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पीएमआरडीएने यापूर्वीचा १०० दिवसांत इमारत उभारण्याचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढत बांधकाम क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केला आहे. चिखली येथे झालेल्या सोहळ्यात आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षक अशोक अदाक यांच्या हस्ते अधिकृत प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. प्राधिकरणाच्या वतीने मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा सन्मान स्वीकारला.
‘मिशन ९५ डेज’चा यशस्वी पराक्रम
या प्रकल्पांतर्गत १४ मजली (डी-३) एलआयजी निवासी इमारत, सुमारे ९४,७२२ चौरस फूट क्षेत्रफळ आणि ११२ सदनिका (२ बीएचके) केवळ ९५ दिवसांत पूर्ण करण्यात आल्या. ‘३-एस प्रीफॅब’ तंत्रज्ञान, प्रीकास्ट आरसीसी प्रणाली, झिरो लेंग शेड्यूलिंग आणि तीन शिफ्टमध्ये सुरू असलेल्या कामामुळे हा वेग शक्य झाला.
मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले की, अचूक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कामगारांच्या अथक परिश्रमामुळे हे यश साध्य झाले. फॅक्टरी-निर्मित प्रीकास्ट घटकांमुळे गुणवत्तेत सातत्य राखत बांधकामाचा वेग वाढवण्यात यश आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीच्या सुमारे नऊ हजार कामगारांनी अहोरात्र काम करत ही इमारत उभी केली.
ही इमारत भूकंपप्रतिरोधक असून शाश्वत नागरी विकासाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम