जळगाव महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची एकमताने निवड

बातमी शेअर करा

जळगाव महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची एकमताने निवड

सर्वपक्षीय सहमतीने निवड प्रक्रिया पूर्ण

जळगाव (प्रतिनिधी):– जळगाव शहर महानगरपालिकेच्या रिक्त स्वीकृत नगरसेवक पदांसाठी बुधवारी (दि. १५ एप्रिल) झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय सहमतीने सात उमेदवारांची निवड करण्यात आली. या निवडीत भारतीय जनता पक्षाचे चार, शिवसेना (शिंदे गट)चे दोन आणि शिवसेना (ठाकरे गट)चा एक सदस्य निवडून आला आहे.

महापौरांकडून अधिकृत घोषणा

महासभेचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या महापौर दीपमाला काळे यांनी नव्या स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. भाजपकडून डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे आणि सुभाष शौचे यांची निवड झाली. शिवसेना (शिंदे गट)कडून हर्षल मावळे व नरेंद्र आत्माराम पाटील, तर शिवसेना (ठाकरे गट)कडून महानगरप्रमुख शरद तायडे यांची निवड जाहीर करण्यात आली.

महासभेत उत्साहाचे वातावरण

निवड जाहीर होताच महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. निवडीनंतर महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रशासन व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या विशेष महासभेला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगर सचिव सतीश शुक्ला तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे दिसून आले.

संख्याबळात वाढ; राजकीय समीकरणे बदलली

या निवडीनंतर महापालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. यात भाजपचे संख्याबळ ४६ वरून ५० झाले असून, शिवसेना (शिंदे गट)ची संख्या २५ आणि शिवसेना (ठाकरे गट)ची संख्या ७ वर स्थिरावली आहे.

विजयी उमेदवारांची मिरवणूक; विकासाचा निर्धार

महासभेनंतर नवनियुक्त नगरसेवकांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत भव्य मिरवणूक काढली. ‘एकच जल्लोष’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी नव्या सदस्यांनी जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम