महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न

बातमी शेअर करा

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न

सर्प हा मानवाचा मित्र आहे – सर्पमित्र जगदीश बैरागी

धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे नागपंचमीचे औचित्य साधून वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था जळगाव व धरणगाव येथील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.डी.पाटील यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय सर्पमित्र भरत शिरसाठ यांनी करून दिला.

सर्वप्रथम शाळेतील वन्यजीव संस्थेचे जेष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक जगदीश बैरागी (महाराज), सर्पमित्र भरत शिरसाठ, कृष्णा दुर्गे, ईश्वर बडगुजर, राजेंद्र कुंभार, निलेश चौधरी, आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार व शिक्षक वृंदांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी १ ऑगष्ट ते १० ऑगष्ट जनजागृती मोहिमेअंतर्गत वन्यजीव संस्था जळगावचे जिल्हाप्रमुख जगदीश बैरागी यांनी सर्प हा मानवाचा मित्र आहे. रात्रीच्या वेळी बाहेर निघताना टॉर्च, काठी व शूज घालून निघावे. सर्पदंश झाल्यावर प्राथमिक उपचार कसे करावे ? याविषयी सर्पमित्र भरत शिरसाठ व त्यांच्या टीमने प्रात्यक्षिक करून दाखविले. सर्पाला कान नसतात, सर्प कधीच दूध पीत नाही, सर्प कधीच बदला (डूख) घेत नाही व सर्प मनुष्य योनीमध्ये कधीच रूपांतर होऊ शकत नाही. पृथ्वीवर निर्माण झालेल्या सर्वात प्राचीन सजीव प्रजातीपैकी ‘साप’ हे एक आहेत. पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे ध्रुवीय प्रदेश वगळता पृथ्वीच्या पाठीवर ते सर्वत्र आढळतात. जगभरात सापांच्या सुमारे ३००० हून अधिक प्रजाती आहेत. भारतात २७५ हूनही अधिक प्रकारचे साप आढळतात. त्यातील ५२ प्रजाती विषारी सदरात मोडतात. जवळ – जवळ ४० प्रजाती या समुद्रसपांच्या असून विषारी आहेत. अर्थातच आपल्यासाठी समाधानकारक बाब म्हणजे आपल्या परिसरातील फारच थोडे साप हे विषारी असतात. प्रामुख्याने आपल्या परिसरात नाग, मण्यार, घोणस व फुरसे हे चार साप आढळतात. साप हे शीत रक्ताचे प्राणी ( वातावरणात होणाऱ्या बदलाप्रमाणे सापांच्या शरीराचे तापमान बदलते ) असून ते अतिशय थंड किंवा उष्ण हवामान सहन करू शकत नाहीत. ८ ° सेल्सिअस ते ४५ ° सेल्सिअस हे तापमान त्यांना जगण्यास अनुकूल असते. सर्पदंश झाल्यावर कोणत्याही बाबा, बुवा, माता, अम्मा, मदारी, गारुडी, स्वामी, यांच्याकडे जाऊ नये. त्याचप्रमाणे मंदिराला अथवा धर्म स्थळाला फेऱ्या घातल्याने सापाचे विष उतरते हा मोठा गैरसमज आहे. म्हणून सर्पदंश झाल्यावर सरळ शासकीय दवाखान्यात जाऊन इलाज करावा. मुंगूसला सापाचे विष बांधत नाही अथवा साप चावल्यास तो विशिष्ट झाडाच्या पाला मूळ खाऊन स्वतःच्या बचाव करतो हा एक गैरसमज आहे. मुंगूसला विषारी सापाने दंश केल्यास मुंगूस निश्चितच मरतो. मंत्रोपचाराने सर्पविष उतरवता येत नाही. परंतु विषारी सापाच्या दंश हा प्राणघातक असला तरी योग्य वैद्यकीय उपचाराने ( प्रति सर्पविष लस ए.एस.व्ही.) प्राण वाचविले जाऊ शकतात. बरेचशे सर्पदंश हे बिनविषारी किंवा निमविषारी सापांमुळे होत असल्याने काही वेळाने रोगी आपोआपच बरा होतो व श्रेय उगाच अर्थहीन अंधश्रद्धांवर आधारलेल्या उपचारांना दिले जाते. साप शक्यतो कोणाच्याही नजरेस स्वत : ला पडू देत नाही, शत्रूशी सामना झाल्यास पळून जाणे किंवा लपणे, अंगावर घेतले असता जोरजोराने फुत्कार सोडणे, मान उंच करून फणा काढणे, मान चपटी करणे अथवा शरीर फुगवणे, शरीराचे वेटोळे करून निश्चेष्ट पडून राहणे, शेपटी वळवळविणे आणि कोणी पकडलेच असता विष्ठा टाकणे, दुर्गंधी सोडणे, ओकणे, आदी अगदीच नाईलाज असेल तर साप हल्ला करतात, अंगावर येतात व दंश करतात. यामागे कुठलाही पूर्वनियोजित डाव किंवा सूडाची भावना नसते. सर्व सापांमध्ये डोळे, जिभ, त्वचा, दात, शेपटी हे अवयव असतात. साप हा भित्रा प्राणी असून तितकाच तुमचा-आमचा मानवाचा व प्रामुख्याने शेतकऱ्यांचा मित्र आहे. असे VJSS चे जेष्ठ सदस्य जगदीश बैरागी व धरणगावातील सर्पमित्र भरत शिरसाट, गणेश गुरव, राजू कुंभार, विक्की माळी, निलेश चौधरी, ईश्वर बडगुजर, निलेश पवार, राजेंद्र वाघ यांनी सापांबद्दल जनजागृती व प्रभोधन केले. जनजागृती व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान श्री. बैरागी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या परिसरात सर्प निघाला तर त्याला मारू नका, आपण सर्पमित्रांना फोन करा व सर्पांना वाचवा असे प्रतिपादन श्री. बैरागी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील यांनी तर आभार एस.व्ही.आढावे यांनी मानले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम