प.पु. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा ७ यांचा चातुर्मास मंगल प्रवेश उत्साहात
जळगावच्या स्वाध्यायभवनात चातुर्मास कार्यक्रम
मुंबई चौफेर । ०९ जुलै २०२२ । जळगाव स्वर्णनगरी आणि आध्यात्मभूमीत जयगच्छाधिपति १२ वे पट्टधर आचार्य प्रवर १००८ प.पु. पार्श्वचंद्रजी म.सा., डॉ. पदमचंद्र जी म.सा., आदी ठाणा ०७ यांचा भव्य ऐतिहासीक चातुर्मास मंगल प्रवेश मोठ्या उत्साहात झाला. ‘जैन धर्म जगातील सहज सोपा धर्म असून जगाला शांतीचा संदेश तर मिळतोच परंतु आत्मोन्नतीचा मार्ग देखील प्राप्त होतो. चातुर्मास काळात धर्म आराधना, प्रवचन श्रवण करून जास्तीतजास्त आध्यात्मिक लाभ श्रावकांनी प्राप्त करावा.’ असे आवाहन डॉ. पद्मचंद्रजी महाराज यांनी केले. स्वाध्यायभवनात मंगल प्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थितांशी त्यांनी सुसंवाद साधला. यावेळी जेजेपी अहिंसा रिसर्च फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, पदाधिकारी व ज्येष्ठ श्रावकांचा सत्कार करण्यात आला. जयगच्छाधिपति १२ वे पट्टधर आचार्य प्रवर १००८ प.पु. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी मांगलीक पाठ व आशीर्वाद दिले.
या शोभायात्रेच्या अग्रभागी लुक एन लर्नचे बालगोपाळ इंद्र, इंद्राणी, राजकुमार, राजकुमारी अशा वेशभूषेत होते. सुशील बालीका मंडळाच्या युवतींनी डोक्यावर मंगल घेतला होता. ‘त्रिशला नंदन वीर की जय बोलो, महावीर की’, ‘जैन धर्म की जय हो’, ‘सभी संत- सतियों की जय हो…’ अशा घोषणा देत. सकाळी पावसाची रिपरिप सुरू असताना गणपती हॉस्पीटल येथून श्रावक-श्राविकांची शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत शहरातील असंख्य भाविक स्त्री, पुरुष अबालवृद्ध सहभागी झाले होते. ज्येष्ठ श्रावक प्रदीपभाई रायसोनी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अमर जैन, आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील (पप्पुभाई) बाफना यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जेपीपी अहिंसा रिसर्च फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमलजी नहार, महामंत्री नवरतनमलजी बोकरीयाजी, विमलचंद सांखला, महेंद्र मेहता, देवराजजी बोहरा, स्वरुप लुंकड (राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांच्यासह पदाधिकारींचा स्वागत-सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. जळगावच्या ममता कांकरिया यांची जेपीपी अहिंसा रिसर्च फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष म्हणून निवड झाल्या बद्दल ताराबाई डाकलिया व नयनतारा बाफना यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय राखेचा यांनी केले.
या वर्षाचा चातुर्मास जयगच्छाधिपति उग्र विहारी, वचन सिद्ध साधक, व्याख्यान वाचस्पति, आशुकवि आचार्य प्रवर श्री पार्श्वचंद्र जी म.सा., एस. एस. जैन समणी मार्ग चे आरंभकर्ता, अणुप्पेहा ध्यान प्रणेता, प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्र जी म.सा., मधुर व्याख्यानी श्री जयेंद्र मुनि जी म.सा ., सेवाभावी श्री जयशेखर मुनिजी म.सा., मौनसाधक श्री जयधुरन्धरमुनि जी म.सा., विद्याभिलाषी श्री जयकलशमुनि जी म. सा., विद्यारसिक श्री जयपुरन्दरमुनि जी म.सा. तसेच श्रमणी सुधननिधीजी आणि श्रमणी सुयोगनिधीजी म.सा. या जैन संतवृंदांचा सहभाग आहे. चातुर्मास काळात धार्मिक आराधना, जप-तप, विविध धार्मिक स्पर्धा, आशयसंपन्न प्रेरक प्रवचने, धर्मचर्चा तसेच अनेकविध धार्मिक अधिष्ठान संपन्न होतील. या चातुर्मास पर्वात देशातील विविध राज्यातून धर्मानुरागी श्रावक वर्गांच्या दर्शनार्थ भेटी देखील होतील.
‘जय परिसर’, स्वाध्याय भवन, गणपतीनगर, आकाशवाणी चौकाजवळ जळगाव येथे संपन्न होणाऱ्या या चातुर्मास सोहळ्यासाठी स्थानिक, परिसरातील, जिल्ह्यातील श्रावक-श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सेवादास दलूभाऊ जैन यांनी केले आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम