बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग – माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । २४ ऑगस्ट २०२२ । कान्हदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जरी निरीक्षक होत्या मात्र त्यांच्या साहित्यातून त्या ज्ञानी आहेत, ज्ञानाला पुस्तकाची किंवा कोणत्याही विद्यापीठाची गरज नसते तर जीवनातील व्यवहारज्ञानातून माणूसकीचा मार्ग आपल्याला मिळतो, हाच माणूसकीचा मार्ग बहिणाईंच्या साहित्यात दिसतो. बहिणाई निसर्गाशी संवाद साधतात आणि पृथ्वीच्या आरशात स्वर्ग पाहतात हे तत्वज्ञान पुढील पिढीला माणुसकीला मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

जुने जळगावमधील चौधरीवाड्यातील बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची 142 वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी बहिणाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, खापर पणतू देवेश चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, ज्ञानेश्वर शेंडे, विजय जैन, हर्षल पाटील, अशोक चौधरी उपस्थित होते. सुदर्शन अय्यंगार व पद्माबाई चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन करण्यात आले. यावेळी मुंबई च्या मनिषा कोल्हे, आदिती त्रिवेदी, रिती शहा, देवेंद्र पाटील यांच्यासह चौधरी वाड्यातील परिवारातील सदस्यांनी बहिणाईंना अभिवादन केले.

पुढे बोलताना सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, अकबर बादशाह यांच्या काळातील कवि रहिम यांच्या साहित्याचा कवयित्री बहिणाईंच्या मायबोली ओव्यांमध्ये सारांश दिसतो. बहिणाईंच्या साहित्याचा तौलनिक अभ्यास विद्यार्थ्यांसह उपस्थितीत साहित्यप्रेमींसमोर उदाहरणांसह मांडला. साहित्य हे प्रवाही असते. बहिणाईंच्या साहित्यामध्ये शेतकरी महिला, तिच्या जीवनातील व्यथा दिसतात. निसर्गाशी एकरूप होऊनच आपल्याला स्वर्ग मिळतो यातूनच परमेश्वराची प्राप्ती होते. यासाठी बहिणाईंच्या ‘माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमधी उगवत’ या ओवींचा दाखला त्यांनी दिला. ज्ञान पुस्तकात नाही तर जीवनात आलेल्या अनुभवात, निरीक्षणातून विकसीत होत जाते अशा साहित्यातून बहिणाई या ज्ञानी, विचारवंत ठरतात असे प्रतिपादन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

अनुभूती निवासी स्कूलचे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेखक, साहित्यिकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे साहित्य अभ्यासले. यावेळी त्यांना मराठी शिक्षक हर्षल पाटील यांनी मार्गदर्शन केले. विजय जैन यांनी बहिणाईंच्या साहित्यावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी बहिणाईंच्या कविता सादर केला. मनपा शिक्षिका पुष्पा साळवे यांनी बहिणाईंवर स्व:लिखीत कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना ज्ञानेश्वर शेंडे यांनी केली. अशोक चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेंद्र पाटील, ललित हिवाळे, प्रशांत पाटील, दिनेश थोरवे यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम