अल्फा’ चित्रपटात आलिया-शर्वरीचा जबरदस्त जलवा; अनोख्या गाण्यातून नवा अंदाज, अनिल-हृतिक-बॉबी यांची विशेष झलक

‘अल्फा’ चित्रपटात आलिया-शर्वरीचा जबरदस्त जलवा; अनोख्या गाण्यातून नवा अंदाज, अनिल-हृतिक-बॉबी यांची विशेष झलक
मुंबई (प्रतिनिधी) – यशराज फिल्म्सच्या आगामी ‘अल्फा’ या अॅक्शनपटात अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी वाघ पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे, या दोघींच्या उपस्थितीत चित्रीत होणाऱ्या एका भव्य गाण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ‘अल्फा’ हा यशराजचा पहिलाच महिला केंद्रित स्पाय युनिव्हर्स चित्रपट असून, त्याची खासियत ठरतोय आलिया-शर्वरी यांचा दमदार परफॉर्मन्स आणि अनोखा लूक.
विश्वसनीय सूत्रांनुसार, या चित्रपटातील एक खास गाणं आलिया भट आणि शर्वरी वाघवर भव्यदिव्य पद्धतीने चित्रित होणार आहे. दोघी अभिनेत्रींनी स्टुडिओमध्ये तासनतास रिहर्सल सुरू केली असून, या गाण्यातून त्यांचा आजवर न पाहिलेला स्टायलिश आणि प्रभावी लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अद्याप गाण्याचं शीर्षक जाहीर करण्यात आलेलं नसलं, तरी याच्या कोरिओग्राफीपासून व्हिज्युअल स्केलपर्यंत सर्व काही दर्जेदार ठेवण्यात येत आहे.
हाय वोल्टेज अॅक्शन आणि कॅमिओचा सरप्राइज
‘अल्फा’ हा महिला केंद्रित हाय-वोल्टेज अॅक्शनपट असून, आलिया आणि शर्वरी यांचे स्टंट आणि मिशन्स हा चित्रपटाचा मुख्य गाभा असेल. विशेष म्हणजे, या चित्रपटात हृतिक रोशन, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांचे देखील विशेष कॅमिओ असणार आहेत, जे चित्रपटात अनपेक्षित वळण घडवणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल करत असून, यापूर्वी त्यांनी ‘द व्हायरेल फीवर’ व अन्य प्रकल्पांतून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘अल्फा’ चित्रपट यावर्षी ख्रिसमस वीकेंडला मोठ्या थाटात प्रदर्शित होणार असून, महिला शक्तीवर आधारित भारतीय सिनेमात एक नवा अध्याय लिहेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम