अहमदाबादजवळ एअर इंडियाचे विमान कोसळले; मोठ्या जीवितहानीची भीती

बातमी शेअर करा

अहमदाबादजवळ एअर इंडियाचे विमान कोसळले; मोठ्या जीवितहानीची भीती

अहमदाबाद (प्रतिनिधी) – गुजरातमधील अहमदाबाद शहरात गुरुवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली असून, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या या AI-171 बोइंग 787-8 ड्रीमलायनर विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते.

विमान उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटांत शहराच्या रहिवासी भागात कोसळले. अपघात इतका भीषण होता की, कोसळल्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण विमानाने पेट घेतला. व्हिडीओंमध्ये विमानाचे तुटलेले पंख व जळालेल्या अवशेषांचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहेत. दुर्घटनेनंतर घटनास्थळी आगीचे मोठे लोळ उठताना पाहायला मिळाले.

बचाव आणि आपत्कालीन प्रतिसाद – घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद पोलिस, अग्निशमन दलाच्या सात गाड्या आणि बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आपत्कालीन बचावपथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जीवितहानीची शक्यता – हे विमान घनदाट लोकवस्ती असलेल्या भागात कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघातातील हताहतांच्या नेमक्या संख्येबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

विमान आणि अपघाताची माहिती – एअर इंडियाचे हे AI-171 विमान (बोइंग 787-8, सीरियल नंबर 36279) नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, हे अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे. विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या अपघातामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून सातत्याने मदतकार्य राबवले जात आहे. केंद्र सरकारकडून आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडून या दुर्घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम