कुणाल शिरूडकर याच्या प्रथम स्मृतीदिनी,दु:खाला तिलांजली देत बुद्धांच्या शाश्वत विचाराने सुमनांजली

कुणाल शिरूडकर याच्या प्रथम स्मृतीदिनी,दु:खाला तिलांजली देत बुद्धांच्या शाश्वत विचाराने सुमनांजली

बातमी शेअर करा

कुणाल शिरूडकर याच्या प्रथम स्मृतीदिनी,दु:खाला तिलांजली देत बुद्धांच्या शाश्वत विचाराने सुमनांजली

अमळनेर येथील बुद्धविहारात बिऱ्हाडे कुटुंबातील जिज्ञासू तरूण कोरोनाच्या महासंकटाने त्याला मागच्या वर्षी हिरावले.त्या कर्मरत, मेहनती तरूणाचा स्मृतीशेष कार्यक्रम मोठ्या संख्येने सहृदय अंतकरणाने,भावुक,साश्रूनयनांनी मान्यवरांच्या विचार मंथनाने पार पडला.

एक आगळा वेगळा कार्यक्रम ज्यामध्ये बुद्धांच्या विचाराचे अधिष्ठान असलेले बि-हाडे कुटुंब तरूण मुलाचे दुःख तथागताच्या विचाराने कमी करून सर्वच तरुणात कुणालला बघण्याचा आशावाद घेऊन जगत आहे. हा मोठा बदल त्यांच्या विचारात दिसून आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रणजीत शिंदे सर यांनी केले. बुद्धवंदना व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर कुणालच्या आठवणींना उजाळा देणारा ” स्मृतीविशेषांक” प्रकाशित करून त्याचे ऑनलाईन व ऑफलाईन उद्घाटन करण्यात आले

कार्यक्रमासाठी बुद्धाच्या विचाराने प्रत्यक्ष जगणारे वक्ते कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. त्यात डॉ.एल.ए.पाटील माजी प्राचार्य प्रताप कॉलेज अमळनेर, डॉ.राहुल निकम समाजकार्य महाविद्यालय चोपडा,प्रा.अशोक पवार सामाजिक कार्यकर्ते,सुदाम महाजन तहसीलदार ,एस.टी.माळी माजी उपजिल्हाधिकारी,सि.के अण्णा पाटील चेअरमन शैक्षणिक संस्था, प्रा.उल्हास मोरे,विनोद मोरे,श्याम अहिरे माजी सभापती यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

प्रा.अशोक पवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत कुणालच्या परिवाराबद्दल भूमिका विशद केली. कुणालच्या काही मित्रांनी मनोगते व्यक्त केली. त्यात प्रकाश खिल्लारे (मलकापूर)याने कुणालच्या आठवणींना उजाळा दिला, कुणाल उत्साही मित्र,माणसे जोडणारा संघटक अशी प्रसंगानुरुप माहिती विशद केली.मयुर पाटील म्हणाला की, सर्वांसाठी काम करणारा दादा म्हणजे आमचा कुणाला दादा असे सांगून विविध प्रसंग सांगितले.कुणालचे गुरु जे.एस.पाटील सर यांनी कुणाल एक कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी असे कुणालबद्दल उद्गार काढले.यानंतर प्रमुख वक्ते डॉ.प्रा.राहुल निकम सर यांनी बुध्दाच्या विचाराने दु:खाचे निवारण होते.बहुजन हिताय,बहुजन सुखाय हा बुद्धांचा सर्वसमावेशक मंत्र सांगितला.बुध्दाने विवेकाने जग जिंकले.द्वेषरहित,मानवतावादी धम्म जगाला दिला त्यात प्रज्ञा,शील,करूणा, अष्टांगमार्ग जगाला दिला.मी सांगतो म्हणून ते खरं माना असे बुद्धाने सांगितले नाही.त्यांनी वेद.यज्ञ नाकारले.स्वर्ग,नरक,आत्मा नाकारला. संविधानात हि सर्व मूल्ये असल्याने संविधान एकमेव जगातील विश्वबंधुत्व निर्माण करणारा,धर्मनिरपेक्षता असलेला ग्रंथ आहे तोच आपल्या देशाची विचार सरणी आहे

कार्यक्रमाचे दुसरे प्रभावी वक्ते डॉ.एल.ए.पाटील यांनी कुणाल सहृदयी मित्र,खडतर मेहनती,विवेकी, प्रगल्भ विचाराचा विद्यार्थी,सुधारक प्रकृतीचा जिज्ञासू असल्याने अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची, खोट्या विरूद्ध आवाज उठविण्याची धमक त्याच्यात होती.

त्याच्या चिकित्सक विचाराने त्याला एक वेगळी उंची गाठता आली होती. त्याला खूप मोठे व्हायचे होते.त्याने फिजिक्स क्षेत्रात संशोधन करून वेगळी प्रतिमा सिद्ध केली असती तो जेव्हा माझ्याकडे यायचा तेव्हा खूप प्रगल्भ विचाराचा विषय घेऊन यायचा.तो नम्र,विवेकी, विनयशील, अभ्यासू,कार्यतत्पर स्नातक होता. काही तरी वेगळं करण्याची धमक त्याच्यात होती.अंहपणा त्यात मुळीच नव्हता.ज्ञानसागरातील असंख्य विचार जीवनात उतरविणारा पथिक होता.

संशोधन झाले पाहिजे पी.एच.डी नाही कारण पी.एच.डी चा बाजार झालाय. संशोधनाला घड्याळ सोडून काम करावे लागते.कुणाल एक उच्च दर्जाचा फिजीक्सचा संशोधक झाला असता.आम्ही एका संशोधकाला मुकलो असे डॉ.एल.ए.पाटील सरांनी प्रतिपादन केले.गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावर बोलतांना त्यांनी शील हे उच्च वागणुकीचे प्रतीक आहे.डॉ. बाबासाहेबांनी एकट्या शीलसंपन्नतेमुळे देश-विदेशात माणसाच्या हृदयात जागा मिळवली. अष्टांग मार्ग मानवाला मिळालेले दान आहे.बुद्ध हे विज्ञान,तत्त्वज्ञान व मानसशास्त्र आहे.श्रवण,वाचन चिंतन, मनन शेवटी निधीध्यासन केले पाहिजे तरच जीवनाला सत्याची,विवेकाची, तेजस्वीतेची धार येते.आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी बुद्धांचा धम्म म्हणजे विचार अंगीकारला पाहिजे. डॉ.बाबासाहेबांना ईश्वररहित धर्म हवा होता.प्रत्येक धर्मातुन चांगली मुल्ये घेतले तर चांगला विचार रुजवता येईल.तर बाबासाहेबांनी सहन केलेल्या वेदनांमुळे भविष्यातील धोके संविधान निर्माण करून मिटविले.एका जन्मात एवढे कार्य शक्य नसते बाबासाहेबांनी ते करून दाखविले.

कुणाल एक धाडसाचे प्रतीक होता. कार्यकारणभाव त्याच्या वृत्तीत होता तोच विचार बुद्धांचा विचार होता.बुद्धशिक्षण हेच मूल्यशिक्षण आहे.बि-हाडे परिवाराने बुद्धांचा विचार जपला.त्यांना हा विचार तरुणांमध्ये कुणाल साकारण्याची संधी देतो.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम महाजन यांनी कुणालचे वडील अशोक आहे म्हणजे शोक न करणारे,त्यांच्या नावातच बुद्धांचा विचार आहे. कुणालने शुद्ध विचार पचवीला होता. कुणाल देणारा दाता होता त्याला देण्यात आनंद होत होता.कुणाल सदैव हसतमुख तरुण होता कुणालला सशक्त मन,विचार करण्याची शक्ती होती.

शेवटी बौध्दाचार्य सिद्धार्थ सोनवणे यांनी सरणंत्तय म्हटले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौतम मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी असंख्य आप्तजन, मित्रपरिवार,नातलग,स्नेहीजन,शिक्षक माता भगिनी उपस्थित होत्या.शेवटी खीरदान वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदानशिव,इंजि.विनोद मोरे,प्रा.उल्हास मोरे,ह्रदनाथ मोरे, सत्यजित बि-हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम