स्पर्धा करायचीच तर विकासाची करा, घाण राजकारण सोडा : ना.गुलाबराव पाटील

स्पर्धा करायचीच तर विकासाची करा, घाण राजकारण सोडा : ना.गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा

स्पर्धा करायचीच तर विकासाची करा,घाण राजकारण सोडा:ना.गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते धरणगावच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन

धरणगाव: धरणगाव शहराच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा असणारी पाणी पुरवठा योजना आजपासून सुरू होत असून यामुळे शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे. यामुळे यावर टीका करणारे तोंडघशी पडले असून त्यांनी स्पर्धा करावी,मात्र ती विकासकामांची करावी असे ठणकावत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आज तब्बल २७ कोटी ४४ लक्ष रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन केले. या योजनेच्या माध्यमातून इतिहासात पहिल्यांदाच शहरातील सर्व जलवाहिन्या बदलण्यात येणार असून २ भव्य जलकुंभ देखील उभारण्यात येणार आहेत.विशेष बाब म्हणजे यासाठी नगरपालिकेवर १० टक्के रकमेचा पडलेला भार देखील आपण शासनाकडून अन्य योजनेतून मंजूर करून आणू अशी ग्वाही पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून दिली. विरोधकांनी घाण राजकारण सोडून विकासायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आज धरणगाव नगरपालिकेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या तब्बल २७ कोटी ४४ लक्ष रूपयांच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.सी.निकम,नगराध्यक्ष निलेश चौधरी,चाकूरचे नगराध्यक्ष कपिल माकणे,मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन,गटनेते पप्पू भावे,वासुदेव चौधरी,विजय महाजन,माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ,सुरेश नाना चौधरी,चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे,जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील,तालुका प्रमुख गजानन पाटील,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,भगवान महाजन, बी. एन.पाटील सर,मोहन पाटील,ऍड.शरद माळी,राजेंद्र ठाकरे,अभिजित पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती

कार्यक्रमाच्या आधी शासकीय आयटीआयपासून शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. येथे प्रारंभी प्रवेशद्वाराचे भूमिपुजन करण्यात आले.यानंतर पाटावरील पुलाचे भूमिपुजन, गोशाळेजवळ पाण्याच्या टाकीचे भूमिपुजन व महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले.तर मुख्य कार्यक्रम जी.एस. नगरातील श्री लॉन्स येथे आयोजीत करण्यात आला

धरणगाव येथे आज येथे पाण्याच्या टाकीच्या भूमिपुजनासह मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात २७ कोटी ४४ लक्ष रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेसह ३० लक्ष रूपयांच्या वैविध्यपूर्ण निधीतून नगरपालिका हद्दीत चोपडा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे भूमिपुजन करण्यात आले. यासोबत जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत जळगाव आणि एरंडोल रोडवर प्रत्येकी ३० लक्ष रूपये खर्च करून प्रवेशद्वार बांधणे आणि दीड कोटी रूपयांच्या धरणगाव-एरंडोल-नेरी-जामनेर रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे या कामांचेही याप्रसंगी भूमिपुजन करण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.सी. निकम यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी या योजनेबाबतची माहिती देत याच्या कार्यान्वयनासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली

धरणगावकरांना दररोज मिळणार मुबलक पाणी

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगाव नगरपालिकेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत २७ कोटी ४४ लक्ष रूपयांची पाणी पुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.यात धावडा येथील पाण्याची उचल करण्यापासून ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या जलवाहिन्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासोबत अनुक्रमे ४ लक्ष २० हजार आणि ३ लक्ष ८० हजार लीटर्स साठवणीची क्षमता असणारे २ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत.तसेच,या जलकुंभांमधील पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहचवण्यासाठी तब्बल ७८ किलोमीटर अंतराची नवीन पाईप लाईन प्रणाली उभारण्यात येणार आहे.धरणगाव शहरातील सध्याची जल वितरण व्यवस्था ही ब्रिटीशकालीन असल्याने जीर्ण झालेली आहे. अर्थात,या योजनेच्या माध्यमातून धरणगावात पहिल्यांदाच जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत.याच्या माध्यमातून धरणगावकरांनी दररोज दरडोई तब्बल १३५ लीटर इतके मुबलक पाणी थेट त्यांच्या घरापर्यंत पोहचणार आहे.विशेष बाब म्हणजे २०५१ सालच्या धरणगावच्या अंदाजीत लोकसंख्येला ग्राह्य धरून ही योजना आखण्यात आली आहे.या योजनेला २८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली.तर २२ मार्च २०२२ रोजी प्रगती कन्स्ट्रक्शन, लातूर या कंपनीला संबंधीत कामाच्या कंत्राटाचे कार्यादेश (वर्क ऑर्डर ) प्रदान करण्यात आले.२ वर्षात ही योजना पूर्णत्वाकडे येणार आहे.

शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्र्यांच्या दुरदृष्टीमुळे हा महत्वाचा प्रकल्प मंजूर झाला असल्याचे कौतुकोदगार काढले. ते म्हणाले की, पक्षीय भेद न करता कामाची गरज लक्षात घेऊन काम करणारे पालकमंत्री म्हणजेच ना. गुलाबराव पाटील होत.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून धरणगावकरांसाठी अतिशय महत्वाचा असणारा पाणी प्रश्‍न आता सुटण्याच्या टप्प्यात आला असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, विरोधकांनी पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्येक टप्प्यात अडथळा आणण्याचे प्रयत्न केले.यातून अनेक आरोप देखील करण्यात आले. मात्र ही योजना प्रत्यक्षात साकार होणार असल्याचे आपण सर्व जण अनुभवत आहोत.या योजनेसाठी धरणगाव नगरपालिकेला १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.मात्र नगरपालिकेला याची तोशीश लागू न देता हा निधी अन्य योजनेतून मिळवण्याचा मी आपल्याला शब्द देत आहे.विरोधकांनी आजवर अनेक शब्द दिले.अनेक दावे केले. यात पाडळसरे धरणातून पाणी आणण्याच्या वल्गना देखील करण्यात आल्या.मात्र याचे पुढे काहीही झाले नाही.आता विरोधकांनी घाण राजकारण सोडून विकासयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.तर भोंग्यावरून फुट पाडण्याचे मनसुबे व्यक्त करणार्‍यांचाच भोंगा वाजल्याची टीका देखील त्यांनी केली.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अभिजित पाटील यांनी केले तर आभार तालुका संघटक ऍड. शरद माळी यांनी मानले

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम